वाई : गेल्या दोन महिन्यापासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बाधित्यांची संख्या पाचच्या आत येत आहे. कोरोनामुक्तांची संख्या साडेतीन हजारपार गेली असून कोरोनामुक्त होणारांची संख्या ३७३१ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे.
वाई शहरासह तालुक्यातील १०३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. वाई तालुक्यातील अकरा गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. १ डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात १२२ नवे रुग्ण सापडले. राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ग्राम सुरक्षा कमिटी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका यांनी काटेकोर नियोजन केले.
मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे योग्य नियोजन केले. याला गावातील जागृत नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. युरोप देशात आलेल्या नव्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे काळाची गरज आहे. तालुक्यात कोरोनाला पूर्ण पायबंद घालून साखळी तोडण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून फिरत्या पथकाद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह व्यावसायिक करीत आहेत. राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत वाई नगरपालिका व तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना सुरू आहे. यामुळे कोरोनाची साखळी पूर्ण तोडण्यासाठी मदत होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
चौकट :
नियमांचे पालन करणे गरजेचे
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची घट झाली असून ही समाधानाची बाब आहे. आरोग्य विभागाच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. कोरोना आटोक्यात असला तरी प्रत्येकाने खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी केेले आहे.