वाठार स्टेशन
सातारा लोणंद हा राष्ट्रीय मार्ग सर्व प्रकारच्या वाहतिकीसाठी अत्यंत खराब असल्याने हा मार्ग खड्डेमुक्त करून मजबूत व्हावा यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय रस्ते विभागातून या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध झाला. त्यानुसार दोन टप्प्यात या रस्त्यासाठी निधी देण्याचे ठरले त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाढे फाटा ते आद्रकी फाटा या २६ किलोमीटर रस्त्यासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा निश्चित करण्यात आली. त्यानुसार यश कन्स्ट्रक्शन लातूर यांनी हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण केले. यातील दुसऱ्या टप्यात आदर्की फाटा ते लोणंद हे रखडलेले काम अपूर्ण असल्याने या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती. या कामासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. अखेर दुसऱ्या टप्प्यातील या १७ किलोमीटरच्या अपूर्ण रस्त्यासाठी आता मंजुरी देण्यात आली असल्याने आता सातारा ते लोणंद हा संपूर्ण ४४ किलोमीटरचा रस्ता आता वाहतुकीसाठी सुखकर होणार आहे.
सातारा लोणंद राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण कामाला वेळ लागणार असल्याने असणारा रस्ता मजबूत करण्यासाठी यश कन्स्ट्रक्शन लातूर या कंपनीला पहिल्या २६ किलोमीटरची निविदा देण्यात आली होती. लोणंद सातारा या एकूण ४४ किलोमीटर अंतरातील पहिल्या टप्प्यात सातारा ते आदर्की फाटा या २६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून या कामात रोड रुंदीकरण न करता असणारा रस्ता मजबूत करण्यात आला आहे. याचप्रमाणे यापुढील कामही पूर्ण होणार आहे.
एन एच ६५ डी असे सातारा लोणंद या राष्ट्रीय मार्गाचे नामकरण करण्यात आले असून सुपा - मोरेगाव, नीरा - लोणंद ते वाढे फाटा सातारा हा मार्ग पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडला जाणार आहे.
गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असणारा हा रस्ता मजबूत होताना या रस्त्यावरील अवजड वाहतूक आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. अन्यथा हा रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो. सध्या या रस्त्यावर देऊर रेल्वे गेटजवळ रेल्वेची इलेक्ट्रिकल केबल क्रॉसिंगसाठी लोखंडी गेट उभारणी केल्याने उंच अवजड वाहतुकीला थोडासा ब्रेक लागला आहे.
सातारा लोणंद या रस्त्याच्या कामाचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी योग्य वेळी कार्यतत्परता दाखवल्याने हा मार्ग बऱ्याच दिवसांनी वाहतुकीसाठी सुकर होणार आहे.
टोल गेट उभारण्याची गरज
सातारा लोणंद राष्ट्रीय मार्ग अवजड वाहतुकीमुळे सतत खराब होत आहे. या रस्त्यावरील अवजड वाहतुकीला रोखण्यासाठी या रस्त्यावर टोल गेट उभे करून यातून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणं शक्य होणार आहे. या टोल गेटमध्ये केवळ मालवाहतूकदारांना टोल आकारावा, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.