खंडाळा : वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील वाहतुकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी, ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाचा मार्ग सुखर व्हावा, यासाठी राज्य अर्थसंकल्पातून विविध रस्त्यांच्या कामासाठी १३३ कोटी मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. त्यामुळे धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.
मतदारसंघातील सर्व गावांना रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असाव्यात, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी नेहमीच कटाक्षाने लक्ष घातले आहे. राज्यातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ असतानाही प्रत्येक गावच्या मूलभूत सुविधांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. तरीही ग्रामीण भागातील लोकांच्या मागणीनुसार विविध रस्ते व पूल बांधणी करणे, तसेच राज्याचे कुलदैवत मांढरदेवी देवस्थानच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभरात लाखो भाविक येत असतात त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या तापोळा खोऱ्यातील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पर्यटकांचा व स्थानिक ग्रामस्थांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राज्य अर्थसंकल्पातून विशेष निधी मिळवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.
या कामांमध्ये वाई तालुक्यासाठी ९३ कोटी ७१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे, तसेच खंडाळा तालुक्यासाठी १० कोटी ६० लाखाचा निधी मिळाला आहे, तर महाबळेश्वरसाठी २९ कोटी ८ लाखाच्या निधीचा समावेश आहे.