खंडाळा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दिवसभरात ५२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे आजअखेर एकूण १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने तालुक्याच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दि. १७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दोन दिवस सुरू होती. सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कारखान्याच्या २१ जागांसाठी कालपर्यंत ८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवार, दि. २१ रोजी आणखी ५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
त्यामध्ये गटातील प्रत्येकी तीन जागांसाठी खंडाळा गट एकूण २२ अर्ज, बावडा गट १५, शिरवळ गट २१, भादे गट २१ अर्ज, लोणंद गट १९ अर्ज दाखल झाले; तर महिला राखीवच्या दोन जागांसाठी ९ अर्ज, संस्था व बिगर उत्पादक सभासद एक जागेसाठी ५ अर्ज, अनुसूचित जाती-जमाती एका जागेसाठी ६ अर्ज, इतर मागास मतदार प्रवर्गच्या एका जागेसाठी १० अर्ज, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एका जागेसाठी १० अर्ज दाखल झाले आहेत.
आज बुधवार, दि. २२ रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होणार असून, त्यानंतर माघारीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
..............................................