सातारा : चार महिन्यांपूर्वी एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १७ वर्षांच्या मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा व कोल्हापूर याठिकाणी नेऊन संबंधिताने हे कृत्य केले. याप्रकरणी अत्याचाराच्या आरोपावरून संशयित मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसमवेत सद्या साताऱ्यात राहते. संशयित अल्पवयीन मुलाशी पीडित मुलीची ओळख होती. या ओळखीतून त्याने मुलीला ऑगस्ट-२०२१ रोजी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी संबंधित मुला व मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही सापडले नव्हते. अखेर २ डिसेंबरला पोलिसांना हे दोघे कोल्हापूर परिसरात सापडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही साताऱ्यात आणले. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सातारा व कोल्हापूर येथे अत्याचार केल्याचे सांगितले.याबाबत अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल याकरीत आहेत.