सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असलीतरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. यामधील तारळी धरण पूर्णपणे भरले असून बलकवडीत ९४ टक्के साठा आहे. इतर चार धरणांत ९७ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, धरण परिसात अत्यल्प पाऊस असून तीन धरणांतून विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच धरणे फुल्ल झाली होती. त्यानंतर पाऊस होत राहिल्याने पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी झाली नाही. परिणामी यावर्षी उन्हाळ्यातही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा टिकून राहिला होता. त्यातच जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरूवात झाली.
काही दिवस धंवाँधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी धरणे भरणार का अशी चिंताही निर्माण झाली होती. पण, आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरूवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्यस्थितीत या धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरणे भरण्यासाठी जवळपास सव्वातीन टीएमसी पाण्याची आवश्यता आहे. त्यातच या धरण परिसरातही सध्या अत्यल्प पाऊस होत आहे.
रविवारी सकाळपर्यंत धोमला अवघा एक मिलिमीटर पाऊस झाला. तर बलकवडी ५ आणि तारळी धरणक्षेत्रात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना, उरमोडी, कण्हेर येथे पावसाची नोंद झाली नाही.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे यावर्षी टक्केवारी एकूण क्षमता
- धोम १३.२२ ९७.९५ १३.५०
- कण्हेर ९.९५ ९८.४९ १०.१०
- कोयना १०२.७७ ९७.६४ १०५.२५
- बलकवडी ३.८३ ९३.९१ ४.०८
- उरमोडी ९.८६ ९९.०० ९.९६
- तारळी ५.८५ १००.०० ५.८५