ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 23 - खंडाळ्यातील सोना कंपनीच्या मालकाने 2 लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात केली आहे. या प्रकरणात एकूण 15 जणांविरोधात खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याही नावाचा समावेश आहे.
सोना कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 'गेल्या काही महिन्यांपासून माझ्याकडून प्रत्येक महिन्यात दोन लाख रुपयांची खंडणी घेतली जात होती. परंतु खंडणी देण्यात खंड पडल्याने मला सातारा येथील सर्किट हाऊस येथे बोलावून घेतले. या ठिकाणी मला उदयनराजे व त्यांच्या सोबत असलेल्या इतर 14 जणांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.'
याप्रकरणी अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, महेश वाघुले, ध्यानेश्वर कांबळे या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.