कऱ्हाड : शिवनगर (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दि. २१ जून रोजी होत आहे. निवडणूक प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशीच कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित यशवंतराव मोहिते यांच्यासह १५ जणांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांच्याकडे दाखल केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले उपस्थित होते. येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यालयात गुरुवारी सकाळपासून उमदेवारी अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ झाला. दिवसभरात २२५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार व गट पुढीलप्रमाणे - सुभाष रामचंद्र जगताप, पांडुरंग भीमराव जगताप, भाऊसाहेब भीमराव जगताप, सुधीर शंकरराव जगताप (वडगाव हवेली-दुशेरे गट), संपतराव राजाराम थोरात, जयवंत शांताराम पाटील (काले-कार्वे गट), विश्वासराव संपतराव मोरे, अजित संपतराव थोरात, अमोल संपतराव थोरात (रेठरे हरणाक्ष - बोरगाव गट), इंद्रजित यशवंतराव मोहिते (रेठरे बुद्रुक - शेणोली गट), विजया रघुनाथ कणसे (महिला राखीव गट), अविनाश मधुकर खरात (भटक्या विमुक्त जाती गट).सहकार पॅनेल (भोसले समर्थक) यांचे उमेदवार - धोंडिराम शंकरराव जाधव, प्रकाश संताराम जाधव (वडगाव हवेली - दुशेरे गट), शिवाजी पांडुरंग जाधव (काले-कार्वे गट). दरम्यान, संस्थापक पॅनेलचे प्रमुख कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह त्यांचे समर्थक आज, शुक्रवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.सहकार पॅनेलचे शनिवारी शक्तिप्रदर्शन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे उमेदवार उद्या, शनिवारी भव्य शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, त्यांचे समर्थक धोंडिराम जाधव यांनी पहिला अर्ज दाखल करून सहकार पॅनेलसाठी ‘कपबशी’ या चिन्हावर दावा केल्याचे मानले जाते. मात्र, रयत पॅनेलच्या मोहिते समर्थकांनी गुरुवारी अर्ज दाखल करून ‘कपबशी’ चिन्हच मागितले आहे. (प्रतिनिधी)
इंद्रजित मोहितेंसह १५ जणांचे अर्ज
By admin | Published: May 22, 2015 12:02 AM