कऱ्हाडातील १५० कुटुंब स्थलांतरित
कऱ्हाड शहरातील दत्त चौक, पाटण कॉलनी, पायऱ्या खालील भाग, कृष्णा घाट, कुंभार पाणंद, जोशी बोळ येथील नागरीवस्तीत गुरुवारी मध्यरात्री पाणी शिरले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन तेथील दीडशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले. पालिका शाळा, मंगल कार्यालय तसेच इतर सार्वजनिक इमारतींमध्ये संबंधित कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- चौकट
नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
कऱ्हाडात कोयना व कृष्णा नदीच्या पाण्याची इशारा पातळी ४५ फुटांची आहे. ती इशारा पातळी पाण्याने ओलांडली असून शुक्रवारी सायंकाळी कोयनेची पाण्याची पातळी आता ५१ फुटावर होती. ही पातळी ओलांडली जाण्याची शक्यता असून पुराच्या पाण्याचा शहरात शिरकाव होण्याची दाट शक्यता आहे.
नदीकाठावर स्वतंत्र पथके तैनात
कऱ्हाड शहरासह तालुक्यातील पूरबाधित क्षेत्रात प्रत्येक नदीकाठावर पोलीस, पालिका व ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक तासाला वाढणाऱ्या पाण्याचा या पथकांकडून आपत्ती निवारण कक्षाला अहवाल देण्यात येत आहे. नदीकाठावर नाकाबंदी केलेल्या ठिकाणीही पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
मोरगिरीतील ग्रामस्थांनी घरे सोडली
रामापूर : अतिवृष्टीमुळे किल्ले मोरगिरी गावाशेजारील डोंगराचा काही भाग कोसळला असून शेतीचे मोठे नुकसान झाली आहे. गावालगत असलेले महादेवाचे मंदिर दरडीखाली गाडले गेले आहे. गुणवंत गडालगत असलेला डोंगराचा भाग कोसळला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ घरे सोडून नातेवाइकांकडे स्थलांतरित झाले आहेत. डोंगरावरचे पाणी आणि त्यासोबत दगड, माती गावात आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
- चौकट
कऱ्हाडातून ‘एनडीआरएफ’चे जवान पाटणला
कऱ्हाड शहरासह तालुक्यात पूरस्थितीत मदतीसाठी पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक (एनडीआरएफ) दाखल झाले होते. मात्र, पाटण तालुक्यातील आंबेघर व मिरगावला भूस्खलन झाल्यामुळे संबंधित पथकाला तेथे मदतीसाठी पाचारण करण्यात आले. त्यामुळे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्यासह एनडीआरएफची दोन पथके शुक्रवारी सकाळीच मदतीसाठी पाटण तालुक्यातील संबंधित ठिकाणाकडे रवाना झाली.