सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, रविवारी १५० नवे रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांची संख्या ६० हजार ७३१ वर पोहोचली आहे. या अहवालामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गतवर्षी ज्या प्रमाणे सातारा आणि कऱ्हाड तालुके कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरले होते. त्याप्रमाणे यंदाही हीच परिस्थिती ओढावली आहे. रविवारी सकाळी १५० जणांचे अहवाल बाधित आले. यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. त्याचबरोबर दिवसभरात ४७ नागरिकांना कोरोनातून मुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ५७ हजार ११३ नागरिक कोरोना मुक्त झाले आहेत. तर बळींची संख्या १ हजार ८७१ इतकी झाली आहे. सध्या १ हजार ७४७ कोरोनाबाधित रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.