कऱ्हाड : ठार मारण्याची धमकी देऊन सोळा वर्षीय मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुमन शामराव सोनवणे (रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर, मलकापूर) यांनी फिर्याद दिली आहे.करण थोरात, सचिन अण्णाप्पा दरागडे, सुमन अण्णाप्पा दरागडे (सर्व रा. हनुमान मंदिराशेजारी, दांगट वस्ती, मलकापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर सतीश शंकर सोनवणे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर दांगट वस्ती येथील सुमन सोनवणे यांचा नातू सतीश सोनवणे हा मंगळवारी दुपारी दांगट वस्तीत असलेल्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. त्यावेळी करण थोरात हा माझ्यासोबत दारू प्यायला चल, असे त्याला म्हणाला. मात्र, सतीशने त्याला नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन करण थोरात याने सतीशला शिवीगाळ, दमदाटी करीत त्याच्या चोचरे बोलण्यावरून टिंगलटवाळी केली. त्यामुळे सतीशने त्याला शिव्या दिल्या. याचा राग मनात धरून करण, त्याचा मामा सचिन दरागडे आणि आजी सुमन दरागडे या तिघांनी सतीशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सतीश तेथून पळत घराकडे निघून गेला. काही वेळानंतर तिन्ही आरोपी सतीशच्या घरासमोर आले. त्यांनी त्याला पुन्हा शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच तू घरातून बाहेर पडलास की तुला जिवंत ठेवणार नाही, तुला मारून टाकणार, असे म्हणून त्यांनी धमकी दिली. या सर्वांपासून थोडे दूर राहावे म्हणून त्याला एकट्याला घरात थांबण्यास सांगितले आणि त्याने गळफास घेऊन जीवन संपविले.कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ठार मारण्याची धमकी देऊन सतीशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुमन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे.
बचावासाठी एकट्याला सोडले अन् घात झालासुमन सोनवणे यांनी नातू सतीशला आतल्या खोलीत जायला सांगून आराम करण्यास सांगितले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सुमन यांनी आतल्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता सतीशने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे त्यांना दिसले.