सातारा : राज्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून धोकादायक गावात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ३६९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले. आतातर प्रशासनाने जिल्ह्यातील संभाव्य पूरप्रवण १७२ आणि दरडप्रवण १२४ यादीच स्पष्ट केली आहे. ९ तालुक्यांत असणाऱ्या या गावांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. तसेच जिल्ह्यात दरडप्रवणची ४१ गावे आहेत.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धुवांधार पाऊस पडतो. यामुळे ओढे, नद्यांना पूर येतो. तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातच दोन वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये काही लोकांना जीव गमवावा लागलेला. तर नुकतीच रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातूच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पाटण तालुक्यात भेटी देऊन स्थलांतरित लोकांची माहिती घेतली.सातारा जिल्ह्यात प्रशासनाने नदीकाठची संभाव्य १७२ पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यात ३३ असून कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ५५, पाटणमध्ये ३१, कोरेगाव ११, वाई १७, खंडाळा तालुक्यात ९ आणि फलटण तालुक्यात १६ गावे आहेत. त्याचबरोबर संभाव्य दरडप्रवण गावांची संख्या १२४ इतकी आहे. यामध्ये सातारा आणि जावळी तालुक्यात प्रत्येकी १०, वाई १८, महाबळेश्वरमध्ये ३६ आणि पाटण तालुक्यात सर्वाधिक ५० गावे संभाव्य दरडप्रवण आहेत. या गावांवर प्रशासनाचे लक्ष असणार आहे.
सातारा जिल्ह्यात पूरप्रवण १७२, दरडची १२४ गावे निश्चित; धोकादायक गावात उपाययोजना सुरू
By नितीन काळेल | Published: July 21, 2023 1:26 PM