नितीन काळेलसातारा : शासनाच्यावतीने पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांनी विमा उतरविला. मात्र, पीक नसलेल्या क्षेत्राचा हा बोगस विमा उतरविण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले आहे. विमा उतरविलेल्या क्षेत्रात कांद्याचे तब्बल ९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर फळबागांमध्येही बोगसपणा आढळला आहे.पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. उर्वरित हप्त्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येते. पण, यावर्षीच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, प्रत्यक्ष पेरणी अहवाल आणि विमा संरक्षित क्षेत्रात तफावत आढळली.त्यामुळे कृषी आयुक्त कार्यालयाने कांदा आणि फळबागांची तपासणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने एक महिना जिल्ह्यात तपासणी राबवली. त्यामध्ये बोगस क्षेत्र आढळले. काही ठिकाणी कांदा आढळून आला नाही. तर कोठे लागवडीपेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरवला. तसेच काही ठिकाणी एखाद्या क्षेत्राचा कांदा विमा काढून दुसरेच पीक घेतल्याचे समोर आले.
कृषी विभागाच्या कांदा तपासणीत ३ हजार १८३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षितमध्ये बरोबर आढळून आले. पण, ९ हजार २७८ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला तेथे कांदाच आढळला नाही. अशा लाभार्थींची संख्या १८ हजार ५१३ आहे. यामध्ये माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर फळपिकांचाही यावर्षी मृग बहरात विमा उतरविण्यात आला होता.यासाठी शेतकऱ्यांना फळानुसार विम्यासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागते. या फळपिकांतही बोगसपणा दिसला. तपासणीत विमा संरक्षित २६७ हेक्टर क्षेत्र बरोबर असल्याचे स्पष्ट झाले. पण, २२३ हेक्टरवरील फळबागांचा विमा बाेगस दिसून आला. अशा लाभार्थींची संख्या ५१७ इतकी आहे. यामध्ये माण तालुक्यात ४५२ लाभार्थी बोगस फळबाग विमाधारक आहेत.कांदा आणि फळपिकांत यंदा शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालीच नसती. पण, शासनाला विमा कंपनींना सुमारे साडेपाच कोटी रुपये हप्त्यापोटी द्यावे लागले असते. कृषी विभागाच्या तपासणीमुळे ते वाचले आहेत. तसेच जिल्हा सनियंत्रण समितीपुढे बोगस प्रस्ताव मांडल्यानंतर रद्दसाठी पाठविले होते. त्यामुळे कांद्याचा बोगस विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव रद्द झाले आहेत.
- कांदा तपासणी गावे - ५१५
- फळबाग तपासणी गावे - ७३
- कांदा क्षेत्र आढळले नाही - ९,२७८ हेक्टर
- फळबाग आढळली नाही - २२३ हेक्टर
फळपीक तपासणीतालुका - तपासणी गावे - क्षेत्र नाही (हेक्टरमध्ये) - लाभार्थी
- फलटण - १९ - २१ - ४६
- खंडाळा - ३ - १ - ४
- खटाव - ११ - ६ - १५
- माण - ४० - १९६ - ४५२
कांदा तपासणी..तालुका - तपासणी गावे - क्षेत्र नाही (हेक्टरमध्ये) - लाभार्थी
- फलटण - १२५ - १,१५२ - ८९८
- खंडाळा - ५८ - १,४५५ - १,४५०
- खटाव - १३८ - २,६४५ - ७,६१५
- माण - १११ - ३,८२७ - ८,०६१
- कोरेगाव - ८३ - १९९ - ४८८
सातारा जिल्ह्यात कांदा पीक पेरणी आणि विमा संरक्षित क्षेत्राची कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक कारणांनी तफावत दिसून आली. हे सर्व प्रस्ताव रद्द झाले आहेत. त्यामुळे कांद्याचा शासनाला विमा संरक्षित हप्ता भरावा लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसता. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढताना काळजी घ्यावी. पीक आहे त्याचाच विमा काढावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी