सातारा : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मार्चच्या प्रारंभी शाळाबाह्य मुलांची सर्वेक्षण मोहीम राबवली. त्यामध्ये सातारा जिल्ह्यात एकूण १८४ मुले (बालके) शाळाबाह्य असल्याचे आढळले. त्यात कधीही शाळेत न गेलेली (ई-वन) ६४, तर सतत गैरहजर (ई-टू) असलेली १२० बालके आहेत. त्यांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात दिनांक १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये एकूण ७ लाख ३२ हजार ७०८ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ई-वन आणि ई-टू प्रकारातील एकूण १८४ बालके शाळाबाह्य आढळली. त्यापैकी १५ जण हे विशेष गरजाधिष्ठीत (दिव्यांग) असून, अन्य कारणांमुळे सहाजण शाळाबाह्य झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कऱ्हाड तालुक्यात ५६ मुले शाळाबाह्य असून, त्यापाठोपाठ कोरेगाव (३९), पाटण (२८) या तालुक्यांचा क्रमांक आहे. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने सातारा जिल्ह्यातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यात ३ ते १८ वयोगटातील ५ लाख ३६ हजार ३०५ बालके आढळली. यामध्ये विशेष गरजाधिष्ठीत असलेल्या बालकांची संख्या १५ तर अन्य कारणांनी शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६९ आहे. जिल्ह्यात एकही बालकामगार नसल्याचे या पाहणीत आढळून आले.
चौकट -
कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक
कऱ्हाड तालुक्यात ई-वन आणि ई-टू प्रकारातील सर्वाधिक ५६ बालके शाळाबाह्य आहेत. रोजगारानिमित्त येणाऱ्या स्थलांतरित कुटुंबांची संख्या अधिक असल्याने शाळाबाह्य बालकांचे प्रमाण अधिक आहे. कऱ्हाड परिसरात ऊसतोडीसाठी येणाऱ्यांच्या टोळ्या मोठ्या असल्याने हा आकडा मोठा दिसत असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
२३५ विद्यार्थ्यांचे झाले स्थलांतर
या शाळाबाह्य बालकांमध्ये १४२ मुले आणि ९३ मुली अशा एकूण २३५ बालकांचे जिल्ह्यातून स्थलांतर झाले आहे. नगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, जालना, नाशिक, बीड आदी ठिकाणी हे स्थलांतर झाल्याचे समोर आले आहे.
चौकट
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, अंगणवाडी सेवक अशा सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांनी गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केले. शहरात १,२०० कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले.
कोट
या सर्वेक्षणामध्ये सातारा जिल्ह्यात जी बालके शाळाबाह्य आढळली आहेत, त्यांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
स्थलांतरित बालकांना शाळेत दाखल केले आहे. उर्वरित मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची सूचना संबंधित शाळांना केली आहे.
- रवींद्र खंदारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी
शाळाबाह्य मुले कोणत्या तालुक्यात किती?
जावळी : ९
महाबळेश्वर : १३
वाई : ९
फलटण : ४
खंडाळा : १३
सातारा : ०
खटाव : १२
माण : १
कोरेगाव : ३९
कऱ्हाड : ५६
पाटण : २८
\\\\\\\