सातारा : शासकीय कराची १९ कोटी ३९ लाख रुपये विक्रीकर थकबाकी न भरल्याने औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या तिघा संचालकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी राज्यकर उपायुक्त जाई वाकचौरे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर ज्योती अशोक जिंदाल, रोहित अशोक जिंदाल आणि अशोक सनवरलाल जिंदाल (सर्व रा. वानवडी, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, या संचालकांची साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत मे. जय माता इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनी आहे. २०१३-२०१४ पासून २०१६-२०१७ पर्यंतची संचालकांकडे १९ कोटी ३९ लाख ५९ हजार २९६ रुपयांची विक्रीकर थकबाकी आहे. संचालकांना वारंवार सांगून व नोटीस पाठवूनही कराची रक्कम संबंधितांनी शासनाकडे भरलेली नाही. त्यामुळे शासनाची हानी झाल्याने ही तक्रार देण्यात आली आहे.सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर तपास करीत आहेत.
शासकीय कराची १९ कोटी थकबाकी, कंपनीच्या तिघा संचालकांवर साताऱ्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 4:16 PM