सातारा : दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर अवकाळीचे पाणी अडविण्यासाठी मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने जिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना राबविण्यात आली. यामधील दोन दिवसांत ग्रामस्थांचा मोठा सहभाग राहिला असून अधिकाऱ्यांनीही हाती पाटी घेऊन काम केले. त्यामुळे सर्वांच्याच प्रयत्नातून १ हजार ९३९ वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले. आता अवकाळी पाऊस झाल्यास पाणी अडून फायदाच होणार आहे.राज्यातच यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवत आहे. परिणामी अनेक गावांना टॅंकर सुरू आहेत. तर सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्नही भेडसावत आहे. त्यामुळे राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. त्यातच पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन पावसाचे पडलेले पाणी अडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. या अंतर्गतच आता जिल्ह्यातही ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ ही संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला.
या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली होती. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात आली. पहिल्या दिवशी बुधवारी ३५५ वनराई बंधारे बांधून पूर्ण झालेले होते. तर दोन दिवसांत एेकूण १ हजार ९३९ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सध्या अवकाळी पाऊस होत असून हे पाणी अडल्यास शेतीसाठी मोठा फायदाच होणार आहे.वनराई बंधारे निर्मिती..तालुका -पूर्ण कामे
जावळी १९७कऱ्हाड १८०खंडाळा ४०खटाव १४८कोरेगाव १०८महाबळेश्वर १५८माण ९७पाटण ५२५फलटण १५७सातारा १०२वाई २२७