उंडाळे : कराड दक्षिणमधील उंडाळे मनव रस्त्यासाठी २ कोटी ४७ लाखांचा निधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
उंडाळे हे गाव कराड आणि मलकापूरनंतर बाजारपेठेने गजबजलेले आहे. उंडाळे भागातील अनेक रस्ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत. उंडाळे ते मनव हा या भागातील महत्त्वाचा रस्ता व्हावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. पूर्वीचा रस्ता काही प्रमाणात खचला होता. या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेती वाहतुकीसाठी तसेच मुख्य बाजारपेठ असणाऱ्या उंडाळे येथे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने या रस्त्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी राज्य शासनाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय नक्कीच दूर होणार आहे.