सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आत्तापर्यंत १ कोटी ५५ हजार रुपयांची मदत केली आहे.या चारही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. नद्या, ओढ्यांना पूर आल्याने काठावरच्या घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांवर दरडी पडल्या. तर अनेक घरे जमीनदोस्त झाली. १३ घरे पूर्णत: पडली. तर ४ हजार ६२४ घरांचे अंशत: नुकसान झाले. जनावरांचे ३२ गोठे पडले.प्रशासनाने सुरुवातीला जीवितहानी टाळण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले. नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यामुळे जीवितहानी कमीत कमी झाली. आता नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे काम सुरु आहे. शहरातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार रुपये व ग्रामीण भागातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १0 हजार रुपये देण्यात येत आहेत.जिल्ह्यातील २ हजार ७0४ लोकांना गहू, तांदूळ वाटप केला आहे. याव्यतिरिक्त ११ हजार ७९५ लिटर केरोसीनचे वाटप केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.नुकसानग्रस्तांना तालुकानिहाय दिलेली मदत
- सातारा : ४0 हजार
- पाटण : ६६ लाख ५ हजार
- कऱ्हाड : ९६ लाख ८0 हजार
- फलटण : ४0 हजार
नुकसान असेहीदुभती जनावरे १५, लहान जनावरे ७ तर २१00 कोंबडल्या अतिवृष्टीच्या काळात मृत्युमुखी पडल्या. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याचे पंचनामे सुरु आहेत.पुरात वाहून गेलेल्यांना प्रत्येकी चार लाखपुरात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहेत. सातारा तालुक्यातील कुसवडे येथील सागर बल्लाळ, कामथी तर्फ सातारा येथील लता चव्हाण, खंडाळा तालुक्यातील सतीश कचरे, रुळे गावचे पांडुरंग शिंदे हे अतिवृष्टीच्या काळात मृत्यूमुखी पडले. त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाच्यावतीने प्रत्येकी चार लाखांची मदत करण्यात आलेली आहे.