सातारा : कंपनी खरेदीसाठी सहा कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने पाचगणी येथील उद्योजकाची तब्बल ३१ लाख ७५ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि खंडाळा तालुक्यातील संशयितांचा समावेश आहे.आदित्य शशांक माने, अॅड. शशांक सखाराम माने, आदित्य माने याची आई (सर्व रा. मानेवाडा, पेठ नाक्याजवळ, ता. वाळवा, जि. सांगली), संजय राघू नवले (रा. गोंदवले, ता. माण), माधवी जवळकर (रा. खंडाळा, ता. खंडाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहिदास ज्ञानदेव राजपुरे (वय ३८, रा. पाचगणी, ता. महाबळेश्वर) यांचा आंबेघर तर्फ कुडाळ, ता. जावळी येथे महाबळेश्वर फुड प्रोडक्टस या नावाने फरसान बनविणे व विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्यांची यातील संशयित आरोपी संजय नवले (रा. गोंदवले, ता. माण) याच्यासमवेत गेल्या दहा वर्षांपासून ओळख आहे.
दरम्यान, वाई येथील एक कंपनी लिलावामध्ये निघाली होती. ही कंपनी विकत घेण्याचे राजपुरे यांनी ठरवले होते. संबंधित कंपनी खरेदीसाठी ६ कोटी इतक्या रकमेची आवश्यकता होती. ही बाब त्यांनी नवले याला सांगितली. त्याने आदित्य माने, शशांक माने तसेच माधवी जवळकर यांचा ग्रुप असून हा ग्रुप बँक कर्ज करून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार राजपुरे यांनी संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी विविध कारणे देत पैसे उकळण्यास सुरूवात केली.
अडीचशे ते तीनशे कोटींचे कर्ज यापूर्वी काहींचे मंजूर झालेले त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे राजापुरे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. सहा कोटींच्या कर्जासाठी प्रोसेसिंग फी म्हणून कर्ज रकमेच्या पाच टक्के आम्हास द्यावी लागेल, असे संबंधितांनी अगोदरच त्यांना सांगितले होते.
संबंधितांकडून विविध कारणे सांगली जात होती. त्यामुळे टप्प्याटप्याने राजपुरे यांनी तब्बल ३१ लाख ७५ हजारांची रक्कम त्यांना दिली. मात्र,तरीही त्यांच्याकडून कर्ज मंजूर होत नसल्याने त्यांनी विचारणा केली. परंतु उलट त्यांनाच धमकावण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.