सचिन काकडे ।सातारा : शहराच्या पश्चिम भागाची तहान भागविणारा ऐतिहासिक महादरे तलाव तब्बल २०० वर्षांनंतर गाळमुक्त होणार आहे. सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीने या तळ्यातील गाळ काढण्याच्या कामास बुधवारी प्रारंभ करण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्णत्वास येणार आहे.
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक वसंत लेवे, नगरसेविका रजनी जेधे, साधना फाळके, नगरसेवक किशोर शिंदे, सागर पावसे, सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
सातारा शहराच्या पश्चिम भागाला पूर्वी ऐतिहासिक महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. या तलावात साठणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ते तुंबून राहत होते. पाण्याचा वापर जेमतेम होत असताना हा तलाव दुर्गंधीच्या विळख्यात सापडला होता. बारमाही वाहणारा हा तलाव सध्या कोरडा पडला आहे. उभारणीच्या तब्बल दोनशे वर्षांनंतर प्रथमच यातील गाळ काढण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.
बुधवारी जलसंपदा विभागाच्या वतीने जेसीबी व पोकलॅनच्या साह्याने तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. सातारा विकास आघाडीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानुसार महादरे तलाव गाळमुक्त करण्याचे ऐतिहासिक काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. तलावातील गाळ प्रथमच काढण्यात येत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार हे काम येत्या पंधरा दिवसांतच मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.कामासाठी ९.५० लाखांची तरतूदसातारा पालिकेच्या वतीने जलसपंदा विभागाकडे सहा लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे. हा निधी क्रेन, पोकलॅन, डिझेल यांसह विविध कामांसाठी खर्च केला जाणार आहे. दरम्यान, या कामासाठी पालिकेच्या वतीने एक क्रेन व व एक यारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. सुमारे साडे तीन लाखांची तरतूद या कामासाठी करण्यात आली आहे. अशाप्रकारे तलाव गाळमुक्त करण्यासाठी एकूण ९.५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.शेतीसाठी मिळणार गाळतलावातून निघणारा गाळ शेजारी असलेल्या शेतामध्ये साठविला जाणार आहे. पालिकेकडून आवश्यकतेनुसार नागरिकांना शेती व बागांसाठी हा गाळ दिला जाणार आहे. तलावातील गाळ जुना असल्याचे शेतीसाठी तसेच झाडांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.