रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचा ओघ लक्षात घेऊन एस. टी. महामंडळातर्फे मुंबईतून २००५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीसाठीही १५०० गाड्यांचे नियोजन असून, त्यापैकी ६०० गाड्यांचे आरक्षणही झाले असल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एस. टी. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.ते म्हणाले की, मुंबईहून १२ तारखेपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. १२ रोजी १९, दि. १३ रोजी ६९, दि. १४ रोजी ३०७, दि. १५ रोजी सर्वाधिक १३३२ आणि १६ रोजी २७८ गाड्या सुटणार आहेत. या गाड्यांना टोल असणार नाही. वडखळ नाका येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी १५ तारखेपर्यंत मुंबईहून येणाऱ्या गाड्या पुुणेमार्गे मुुंबईला जातील तर चिपळूणला आलेल्या गाड्या कात्रजमार्गे जातील. गेल्या सहा महिन्यात ४९७ चालकांची भरती करण्यात आल्याने आता चालकांची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले. गणेशोत्सव कालावधीत अपघात होऊ नये, यासाठी यावर्षी एस. टी. महामंडळाने वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. कशेडी घाट उतरल्यानंतर मुख्य चेकपोस्ट येथे चालक - वाहकांना ताजेतवाने होण्यासाठी अल्पोपहार देण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर (चिपळूण) आणि संगमेश्वर येथे दुरूस्ती पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वर ते खारेपाटण आणि संगमेश्वर ते कशेडी अशी दोन भरारी पथके २४ तास कार्यरत रहाणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. कोकण रेल्वे प्रशासनाने यावर्षी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी चिपळूण आणि रत्नागिरी येथे सर्व स्थानिक आणि शहरी गाड्या व्हाया रेल्वेस्थानक करण्यात येणार आहेत. यावर्षीही ग्रुप बुकिंग सेवा देण्यात येणार असून, त्यातीलच ६ गाड्यांचे आरक्षण गुहागर तालुक्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत एस. टी. सेवेबाबत माहिती देण्यासाठी मुख्य स्थानकावर प्रवासी मित्रही नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच बसस्थानकांवर प्रवाशांच्या स्वागताचे बॅनरही लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एस. टी. ची माहितीपुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.खासगी आरक्षणात रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असून, जिल्ह्यात ५३ खासगी आरक्षण सेवाकेंद्रे असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. (प्रतिनिधी)परतीच्या ६०० गाड्यांचे आरक्षणवडखळ नाका येथील कोंडीवर उपाय.परतीच्या ६०० गाड्यांचे आरक्षण.गाड्यांना टोल नाही.चालकांची कमतरता नाही.दुरूस्ती पथक तैनात.कशेडी घाटात अल्पोपहाराची व्यवस्था.
मुंबईतून येणार २००५ गाड्या
By admin | Published: September 11, 2015 9:27 PM