सातारा : जिल्ह्यात २०३ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. १० हजार ९५१ तपासण्यांमधून हे रुग्ण आढळले आहेत तसेच सलग तिसऱ्या दिवशी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आल्याचे चित्र आहे. साताऱ्यात सर्वाधिक ४४ तर त्याखालोखाल फलटण तालुक्यात ३५ रुग्ण आढळले. जावली ४, कऱ्हाड १८, खंडाळा ३, खटाव ३७, कोरेगांव १५, माण २७, महाबळेश्वर १, पाटण २, वाई १३ व इतर ४ असे आजअखेर एकूण २ लाख ४५ हजार ६८५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ६ हजार २२ वर स्थिर आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ४८८ जणांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले असून ७ हजार ३१६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.