सचिन काकडे ।सातारा : टंचाई काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी सातारा पालिकेच्या वतीने शहर व परिसरात कूपनलिका बसविण्यात आल्या. या कूपनलिकांचा वापर आजही नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, पालिकेकडून नियमितपणे देखभाल व दुरुस्ती केली न गेल्याने पाणी असूनही काही कूपनलिका नावापुरत्या उरल्या आहेत. शहरात एकूण २०६ कूपनलिका असून, यापैकी अनेकांना गंज चढला आहे तर काही मोडकळीसही आल्या आहेत.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कास ही शहराची सर्वात जुनी पाणीयोजना आहे. शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी पाहता भविष्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता यावी, यासाठी पालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कूपनलिका उभारण्यात आल्या. सध्या शहर व परिसरात एकूण २०६ कूपनलिका असून, यापैकी बहुतांश नादुरुस्त असून, काहींना गंजही चढला आहे.
काही कूपनलिकांचे पाणी पिण्यायोग्य असल्याने नागरिक याचा पिण्यासह दैनंदिन कामासाठी वापर करीत होते. घरगुती नळांना पाणी न आल्यास गृहिणींना कूपनलिकांचाच आधार मिळत आहे. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे. कूपनलिकांना पाणी असूनही याचा वापर करता येत नाही. पालिकेकडून पाणी बचतीसाठी जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे कूपनलिकांची दुरवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कूपनलिकांची दुरुस्तीची मागणी आहे.दुरुस्तीचे १५ प्रस्ताव दाखलपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे कूपनलिका दुरुस्तीचे आतापर्यंत पंधरा प्रस्ताव दाखल झाले आहेत. दुरुस्तीसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध होताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
पाणी नसलेले पंप बंदशहरातील कूपनलिका गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली आहे. ज्या कूपनलिकांचा पाणी आहे, अशाच कूपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. ज्या कूपनलिका गंजल्या आहेत व ज्यांना पाणीच नाही, अशा कूपनलिका बंद केल्या जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.