चाफळ :
पाटण तालुक्यातील चाफळ विभागात
कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. विभागाला कोरोना संक्रमणाचा विळखा वाढू लागल्याने ही चिंतेची बाब बनली आहे.
दोन दिवसांत नव्याने सहा कोरोना रुग्णांचा अहवालबाधित आल्याने चाफळ विभाग धास्तावला गेला आहे. सध्या विभागात ६ गावांत कोरोनाने शिरकाव केला असून बाधितांचा आकडा २१ वर पोहोचला आहे. त्यात
प्राथमिक आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्ट व आरोग्य सहाय्यकेसह माजगांव, बाबरवाडी, कडववाडी, जाधववाडी येथील बाधितांचा समावेश आहे तर यापूर्वी सडावाघापूर येथील कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
विभागात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच माजगाव येथील सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने विभागाला काहिसा दिलासा मिळाला आहे.
शनिवारी व रविवारी विभागातील काही जणांना ताप व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने काहींची अँटिजेन तर काहिंची आर.टी.पी.सी.आर. चाचणी चाफळच्या आरोग्य केंद्रात करण्यात आली होती. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला यामध्ये जाधववाडी - १, प्रा.आ.केंद्र -१, कडववाडी - १, बाबरवाडी- १ व माजगांव येथील - २ असे सहा जण बाधीत आढळून आले आहेत.
चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका बाधीत आढळून आली होती. दोनच दिवसांत पुन्हा येथील फार्मासिस्ट बाधित आढळून आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तर काही कर्मचारी निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वा:स टाकला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे व आरोग्य सेवक डी. व्ही. गायकवाड यांनी काही जणांची अँटीजन चाचणी केली असता यात माजगाव मधील दोनजण तर आर.टी.पी.सी.आर. चाचणीच्या अहवालात बाबरवाडी, जाधववाडी, माजगाव येथील प्रत्येकी १ व चाफळ येथे राहणारे फार्मासिस्ट असे एकूण सहा जण असे दोन दिवसांत बाधित आढळून आले आहेत.