सातारा : जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमधील बाधित शेतकऱ्यांना मदत निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख रुपये नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानंतर प्रशासनानेही युद्धपातळीवर पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र, त्याची मदत आता जाहीर झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना १४ कोटी ४ लाख १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.फलटण तालुक्यातील २ हजार ६५८ शेतकऱ्यांचे ८७३ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी २ कोटी २८ लाख ४४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. कोरेगाव तालुक्यातील ६८४ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टरसाठी ३५ लाख ८८ हजार, कऱ्हाड तालुक्यातील १६८ शेतकऱ्यांना ३३ हेक्टरसाठी ६ लाख ७ हजार रुपये मदतीसाठी वितरित केले जाणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ५४४ शेतकऱ्यांचे १७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता ४७ लाख ५६ हजार, पाटणमधील ३७२ शेतकऱ्यांना ४०.६१ हेक्टरसाठी ३ लाख ९३ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर झालेला आहे. तर खंडाळा तालुक्यातील ७ हजार ७८० शेतकऱ्यांचे १ हजार ८५५ हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख २५ हजार रुपये मिळणार आहेत. खटाव तालुक्यातील ४ हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार ५४७ हेक्टरवरील नुकसानीपोटी ३ कोटी ६४ लाख ३९ हजार, माण तालुक्यातील ३ हजार २२१ शेतकऱ्यांना १ हजार ५० हेक्टरसाठी २ कोटी ५८ लाख ४६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातील ३२ शेतकऱ्यांचे सुमारे आठ हेक्टरचे नुकसान झालेले. त्यासाठी १ लाख ११ हजार, जावळी तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांना ७७ हजार आणि वाई तालुक्यातील १ हजार ५२२ शेतकऱ्यांना २४ लाख ३२ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण २१ हजार ४८७ शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे.
सहा हजार हेक्टरचे नुकसान; भरपाई लवकरची अपेक्षा...जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये ५ हजार ९७३ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे बळीराजा कोलमडून पडला होता. आता उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला आहे. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.