लोणंद : माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर लोणंद नगरपंचायतीच्यावतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये बावीस किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
याबाबत माहिती अशी की, पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. यामध्ये माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानअंतर्गत लोणंद नगरपंचायतीच्यावतीने गुरुवार, दि. ३१ रोजी गुरुवारच्या आठवडा बाजारात प्लास्टिक जप्तीची धडक कारवाई करण्यात आली. लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक शंकर शेळके, आरोग्य अभियंता श्रद्धा गर्जे, आरोग्य विभाग प्रमुख रामदास तुपे, मुग्धा डोईफोडे, पांडुरंग शेळके, सदाभाऊ शेळके या कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभाग घेतला.
या कारवाईमध्ये २२ किलो प्लास्टिक नगरपंचायतीमार्फत जप्त करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले होते. शासनाच्या दिलेल्या नियमानुसार प्लास्टिक वापर करावा अन्यथा नगरपंचायतीमार्फत यापुढे ही मोहीम आधिक तीव्र करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशवी, प्लास्टिक ग्लासची विक्री करणाऱ्या व त्याचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले आहे.