सातारा : जिल्ह्यात मागील वर्षीच्या लाटेपेक्षा यंदाची कोरोनाची लाट महाभयंकर असल्याचे समोर येत आहे. १५ एप्रिल रोजी प्रशासन संचारबंदीच्या पहिल्या दिवसाचे नियोजन करत असतानाच कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांकी आकडा समोर आला. जिल्ह्यात गुरुवारी नवे ११८४ रुग्ण आढळून आले तर तब्बल २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ही मृत्यूवाढ जिल्ह्यासाठी चिंताजनक समजली जात आहे.
जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू असून, रुग्णालये हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत. प्रत्येकजण रुग्णालयात बेड कुठे शिल्लक आहे, याची माहिती घेत आहे. इतकी भयानक परिस्थिती साताऱ्यात झाली आहे. त्यातच कोरोनाचे आकडे आता हजाराच्यावर जाऊ लागले आहेत.
गत चोवीस तासात गुरुवारी आलेल्या ११८४ जणांचा अहवालामध्ये तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आनेवाडी (ता. जावळी) येथील ४४ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील ७६ वर्षीय महिला, जरेवाडी, ता. सातारा येथील ६४ वर्षीय महिला, कामेरी, ता. सातारा येथील ८१ वर्षीय महिला, चिंचणेर, ता. सातारा येथील ७० वर्षीय महिला, साताऱ्यातील प्रतापगंज पेठेतील ७० वर्षीय पुरुष, करंजे, ता. सातारा येथील ८४ वर्षीय पुरुष, गोंदवले, ता. माण येथील ३७ वर्षीय पुरुष, साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेतील ७६ वर्षीय महिला, राजेवाडी, ता. खंडाळा येथील ५८ वर्षीय पुरुष, बावधन, ता. वाई येथील ७० वर्षीय पुरुष, तारुख, ता. कऱ्हाड येथील ८० वर्षीय पुरुष, औंध, ता. खटाव येथील ६३ वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ३७ वर्षीय पुरुष, हडपसर, जि. पुणे येथील ६० वर्षीय महिला, येवडेवाडी, पुणे येथील ४८ वर्षीय पुरुष, जुनखेड, ता. सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, कऱ्हाडमधील ९० वर्षीय महिला, ओगलेवाडी, ता. कऱ्हाड येथील ७४ वर्षीय पुरुष, मांडवे, ता. सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, रविवार पेठ, ता. फलटण येथील ५३ वर्षीय पुरुष, शिरवळ, ता. खंडाळा येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ७७ हजार ५२४ इतकी झाली आहे, तर बळींचा आकडा दोन हजार २८वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ६५ हजार ५३१ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या नऊ हजार ९६५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
चौकट : धोक्याची घंटा.. पाॅझिटिव्हिटी रेट २४.३१ वर
सातारा जिल्ह्यात रुग्णवाढीचा पाॅझिटिव्हीटी रेट गत वर्षीसारखा पुन्हा एकदा वाढला असून, गुरुवारी तो २४.३१ वर पोहोचला. जिल्ह्यात विविध ठिकाणी सर्वात जास्त २६३९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून, त्यामध्ये ६१४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. रॅपिड टेस्ट २२३१ झाल्या असून, यातून ५७० रुग्ण बाधित आढळून आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात २०५२ जणांच्या चाचण्या झाल्या. त्यामध्ये ४३२ जण पाॅझिटिव्ह आढळून आले.