वाठार स्टेशन : खड्ड्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेला सातारा-लोणंद राज्यमार्ग लवकरच कात टाकणार आहे. शासनाने या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा निश्चित केली असून, लवकर कामास प्रारंभ होणार आहे.सातारा-लोणंद राज्यमार्ग चौपदरीकरणाला वेळ लागणार असल्याने सध्या असणारा रस्ता मजबूत करण्यासाठी लातूरच्या यश कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाची निविदा निश्चित झाली आहे. सातारा-लोणंद या एकूण ४४ किलोमीटर अंतरातील पहिल्या टप्प्यात सातारा ते वाठार स्टेशन या २६ किलोमीटरचे काम सुरू करण्यात येणार आहे.
या कामात रुंदीकरण न करता असणारा रस्ता मजबूत करण्यात येणार आहे. या रस्ताच्या कामाची पहिली निविदा २४ मार्च २०२० रोजी काढण्यात आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार असून, कंपनीकडून रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.या मार्गावरील असणाऱ्या सर्व ब्रिटिशकालीन पुलांची देखील डागडुजी केली जाणार आहे. मात्र, सुरुवातीला २६ किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम हाती घेण्यात येणार आहे.
गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असणारा हा रस्ता मजबूत होत असताना आता या रस्त्यावरील अवजड वाहतुकीवर देखील नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. अन्यथा हा रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो. सातारा-लोणंद या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी योग्यवेळी कार्यतत्परता दाखवल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांची परवड आता थांबणार आहे.