पुसेगाव : नेर तलावाच्या बाजूस असलेल्या खापेवस्ती (नागनाथवाडी ता. खटाव) येथे सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालूनही बैलगाड्यांच्या शर्यती लावल्याप्रकरणी व न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी सहाजणांसह अज्ञात २० ते २५ जणांवर पुसेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या बैलगाड्याच्या आड्यावरून शर्यतीसाठी वापरण्यात येणारे सुमारे ५ लाख ३८ हजार ६५ रुपयांचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी इम्तियाज मुल्ला यांनी याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नागनाथवाडी परिसरात नेर तलावाच्या बाजूस असलेल्या खापे वस्तीनजीक ललगुण येथील प्रताप अनिल घाडगे, अनिकेत धनाजी घाडगे, अमर जगदीश घाडगे, मारुती शामराव चव्हाण, रवींद्र ज्ञानदेव फाळके (शिंदेवाडी), शिवाजी शंकर जगदाळे (रा. कवडेवाडी, ता. कोरेगाव) तसेच अज्ञात सुमारे २० -२५जणांनी सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडी शर्यती बंदी असतानाही शर्यतीचे आयोजन केले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत प्राण्यांना निर्दयपणे वागवणेस प्रतिबंध कायदा १९६० कलम ११ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली. संशयितांकडून चार बैल जोड्या,चार छकडे, तीन चांदी कलरच्या गदा, मोबाइल व रोख रक्कम असा सुमारे ५ लाख ३८ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.