दत्ता यादव ल्ल सातारा सातारा : लोकसंख्या आणि वाहनांची संख्या दिवसागणीक वाढत चालली आहे. त्यामुळे वेळेची बचत आणि नागरिकांचा सुखर प्रवास व्हावा, या हेतूने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेंद्रे ते शिरवळ या ६५ किलोमीटर अंतराच्या महामार्गावर तब्बल २५ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून १५ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी सोडविण्यातच प्रशासनाची अक्षरश: दमछाक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १९९५ पूर्वी दुपदरी रस्त्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी सुरूवातीच्या काळातच नागरिकांकडून मोठा विरोध झाला होता. परंतु प्रशासनाने टप्प्याटप्प्याने यामध्ये तोडगा काढून महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरूच ठेवले. हे काम पूर्ण होताच पुन्हा चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. २०१० पर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर २०१० पासून महामार्गाच्या सहापदरीकरणाला प्रारंभ झाला. महामार्ग सहापदरीकरणाची मान्यता देतानाही ठेकेदारीपद्धतीवरून प्रशासन आणि खासगी कंपनीमध्ये बराच गहजब उडाला होता. अखेर सहा सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून हे काम नेमके किती दिवस सुरू राहाणार, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे. सहापदरीकरणाचे काम होणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे. रोज अपघात आणि धिम्यागतीने सुरू असलेली वाहतूक यामुळे सहापदरीचे काम जलदगतीने व्हावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या शेंद्रे ते शिरवळपर्यंत ६५ किलोमीटर अंतरात तब्बल २५ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. परंतु सध्या सहा पुलांवरून सातारा ते पुणे एकेरी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. अत्याधुनिकीकरणामुळे पुलाचे बांधकाम वेगळ्या धरतीवर करण्यात येत आहे. मुंबई, हैदराबाद आणि मध्यप्रदेशमधून चांगल्या दर्जाचे स्टील उड्डाणपुलाच्या कामासाठी मागविण्यात आले आहे. उड्डाणपुलावर कितीही वाहने उभी राहिली, तरी पुलाला धोका निर्माण होणार नाही. एक पूल हजारो टन वजन पेलू शकेल, एवढी क्षमता या नवीन बांधीव पुलामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
६५ किलोमीटरमध्ये २५ ‘उड्डाणे’!
By admin | Published: June 28, 2015 12:29 AM