महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर-पाचगणीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तुटल्याने ऐन हंगामान पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पर्यटनस्थळी दाखल झालेल्या सुमारे २५ हजार पर्यटकांना याचा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली असून, बांधकाम विभागाकडून खचलेल्या ठिकाणी भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर व पाचगणीला वेण्णा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मे महिन्यात हजारो पर्यटक या पर्यटनस्थळांना भेटी देतात. त्यामुळे उन्हाळ्यात दोन्ही शहरांना घरगुती वापरासाठी व हॉटेलसाठी दररोज ४३ लाख लिटर पाण्याची गरज भासते. सोमवारी सकाळी धरणाच्या सांडव्याजवळ बांधकाम विभागाकडून पुलाचे काम सुरू होते. यावेळी अचानक सांडव्याजवळील काही भाग खचला आणि मातीचा आधार निसटल्याने पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तुटली.
या घटनेनंतर पालिका प्रशासन व बांधकाम विभागाची धावपळ सुरू झाली. खचलेल्या ठिकाणी भराव टाकण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. दरम्यान, मंगळवारी दोन्ही शहराला पाणीपुरवठा न झाल्यास पर्यटनस्थळी आलेल्या २५ हजार पर्यटकांना याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.