दत्ता यादव
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तसेच ५६ तोळ्यांचे दागिने आणि दोन लाख ४० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.
सुनील ऊर्फ सुशील बबन भोसले (रा. रामनगर, कटकेवाडी, पो. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे), रोहन बिरू सोनटक्के (रा. मुरूम, उमरगा, जि. अहमदनगर), महेंद्र रामाभाई राठोड (रा. कुसेगाव, दाैंड, ता. पुणे), संदीप झुंबर भोसले (रा. वाघोली, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेली माहिती अशी की, खेड (ता. सातारा) येथील एका घरातून १३ मार्च रोजी तब्बल २९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे ९ लाख २९ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारानंतर पोलिस निरीक्षक अरुण देवकर व त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आजूबाजूच्या लोकांकडे माहिती घेतली तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे ही घरफोडी सराईत आरोपी सुनील भोसले याने केल्याचे समोर आले. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित फर्णे आणि विश्वास शिंगाडे यांची दोन पथके तयार करण्यात आली. या पथकाने पाळत ठेवून सुनील भोसले याला साताऱ्यातून अटक केली. त्याने एकट्याने १२ घरफोडीचे व २ चोरीचे, असे एकूण १४ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे १३ लाख १९ हजार ९०० रुपयांचे १९ तोळ्यांचे दागिने आणि एक बोल्ट कटर, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्यही हस्तगत केले.
त्याचबरोबर पोलिसांच्या यादीवरील रोहन सोनटक्के, महेंद्र राठोड, संदीप भोसले यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या पाच जणांनी एकूण ६ घरफोडीचे आणि ६ चोरीचे, असे १२ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३६ तोळ्यांचे दागिने व २ लाख ४० हजारांची रोकड, असा सुमारे २४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, हसन तडवी, अमित सपकाळ, गणेश कापरे, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार आदींनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरी
अटक केलेले सहा जण स्वतंत्रपणे चोरी करत होते. पोलिसांनी एका-एकाला शोधून अटक केली. सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका, खंडाळा, कोरेगाव, वडूज, उंब्रज, औंध, कऱ्हाड, फलटण, भुईंज, वाई आदी ठिकाणी या सहा जणांनी चोरी केल्याचे समोर आले आहे.