सातारा : बँकेत नोटा मोजण्यास मदत करणाऱ्याने २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद सखाराम बाबू पवार (वय ५८, रा. वेळेमायणी-ठोसेघर, ता. जावळी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २३) दुपारी साडेबाराच्या सुमारास सखाराम पवार हे प्रतापगंज पेठेतील बँकेत धनादेश वटवून पैसे काढण्यासाठी आले होते. धनादेश साठ हजार रुपयांचा होता. घराच्या बांधकामासाठी त्यांना हे पैसे काढायचे होते. बँकेतील लिखापढी करण्यासाठी त्यांना एका अज्ञात इसमाने मदत केली. कॅशिअरकडून पैसे मिळाल्यावर याच इसमाला पवार यांनी नोटा मोजून देण्यास मदत करण्याची विनंती केली.संबंधित इसमाने नोटांच्या गठ्ठ्यात हजार रुपयांच्या दोन-तीन नोटा खराब असल्याचे सांगून पवार यांना त्या बदलून घेण्यास सांगितले. नोटा बदलून आणेपर्यंत नोटांच्या गठ्ठ्यातून २६ हजार रुपये गायब झाले होते आणि संबंधित इसमाने त्यांना ३४ हजार रुपयेच दिले, असे पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. सातारा शहरातील अनेक बँकांमध्ये अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिकांना नोटा मोजून देण्याचा बहाना करुन लुटणारे महाभाग आढळत आहेत. (प्रतिनिधी)
नोटा मोजून देणाऱ्याकडून २६ हजारांची फसवणूक
By admin | Published: February 24, 2015 10:55 PM