आॅनलाईन लोकमतशिरवळ (जि. सातारा), दि. २५ : खंडाळा तालुक्यातील भादे याठिकाणी बंद घर चावीने उघडून डब्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भादे येथील संदिप जगन्नाथ साळुंखे हे भोळी, ता. खंडाळा येथील मित्र यशवंत चव्हाण यांच्याकडे मुलाला सोडून खंडाळा याठिकाणी दुचाकीच्या कामासाठी गेले होते. यादरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संदीप साळुंखे यांची पत्नी गावातील धार्मिक कार्यक्रमाकरिता घराला कुलूप लावून गेल्या होत्या. यावेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्या परत आल्या असता त्यांना घराची चावी नेहमीच्या ठिकाणी सापडली नाही. यावेळी त्यांनी शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी चावी मिळून आली. दरम्यान, घराचे कुलूप उघडल्यानंतर घरामधील साहित्य व स्टीलचे डब्बे अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. यावेळी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले दीड तोळ्यांचे सोन्याचे मनीमंगळसूत्र, दोन दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम असा २६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात संदीप साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत निकम हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
भादे येथे घरातून २६ हजारांचा ऐवज लंपास
By admin | Published: April 25, 2017 1:47 PM