मलकापूर : ‘प्रियदर्शनी कन्यारत्न योजना’ येथील पालिकेने राबवली आहे. ही योजना दहा वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील २७१ कुटुंबातील मुलींना लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या विसाव्या वर्षी एक लाख रुपये मिळत असल्यामुळे मलकापुरात जन्मलेली मुलगी जन्मत:च लक्षाधीश होत आहे. त्यामुळे ही मुदत ठेव योजना स्त्री शक्तीला बळ देणारी योजना ठरत आहे.
येथील पालिकेने आजपर्यंत विकासकामांबरोबरच सामाजिक प्रश्नांनाही तेवढेच महत्त्व दिले आहे. विविध नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलगी जन्माला येण्यापूर्वीच काहीवेळा भ्रूणहत्या केली जाते. ही प्रवृत्ती रोखणे व कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, ही भावना ठेवून पालिकेने देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी २०११ पासून ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत ही नावीण्यपूर्ण योजना शहरात राबविण्याचा निर्णय घेतला.
योजनेंतर्गत शहरात जन्मलेल्या मुलीच्या नावावर पंधरा हजार रुपयांची ठेव पावती केली जाते. ठेव पावती मुलगी, आई व मुख्याधिकारी यांच्या नावे संयुक्तरीत्या ठेवली जाते. पावतीला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित मुलीला एक लाखाचा लाभ मिळणार आहे. पूर्वी योजनेत सहभागी होण्यासाठी मुलगी जन्मानंतर दोन वर्षापर्यंतची मुदत होती. ती मुदत आता तीन वर्षे केलेली आहे. आज अखेर शहरात जन्मलेल्या २७१ मुलींनी याचा लाभ मिळाला आहे. मुलीच्या शिक्षणाला किंवा लग्नाला या रकमेचा वापर होणार आहे. त्यामुळे पालकांची चिंता कमी झालेली आहे. या योजनेसाठी वैशाली रेके व सुचिता बलवान या महिला कर्मचारी काम पाहत आहेत.
- चौकट
तीन प्रकारात मिळतो लाभ
१) दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
पालकांकडून १ हजार ५०० रुपये पालिकेचे १३ हजार ५०० रुपये
२) एक लाखापेक्षा कमी उत्पन्न
पालकांकडून ३ हजार ७५० पालिकेचे ११ हजार २५०
३) लाखापेक्षा जास्त उत्पन्न
पालकांकडून ७ हजार ५०० पालिकेचे ७ हजार ५००
(तिन्ही गटातील लाभार्थी कन्येला वीस वर्षानंतर एक लाख रुपये मिळतात.)
- कोट
स्त्री भ्रूणहत्या रोखली जावी. मुलीच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, ही भावना ठेवून पालिकेने महिला व बाल कल्याण फंडातून २०११ पासून ही नावीण्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय राज्यात प्रथम घेतला आहे. दहा वर्षांपासून यशस्वीपणे योजना राबवली आहे. योजना यापुढेही चालू राहणार आहे. तीन वर्षांच्या आतील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- मनोहर शिंदे
उपनगराध्यक्ष, मलकापूर
- कोट
मुलीच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करून पालिकेने राबविलेली ही योजना खूपच चांगली आहे. या योजनेमुळे आम्हाला मुलीच्या शिक्षणाची व लग्नाची कसलीच चिंता राहिली नाही. आम्हाला मोठा आधार व दिलासा या योजनेमुळे मिळाला आहे. त्यामुळे शहरामध्ये मुलींचे आनंदात आगमन करताना पालक वर्ग दिसत आहे. माझ्यासारखी अनेक कुटुंबे या योजनेमुळे निश्चिंत झालेली आहेत.
- रूपाली ननावरे
गृहिणी, आगाशिवनगर
फोटो : २०केआरडी०२
कॅप्शन : प्रतीकात्मक