खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाची साथ पुन्हा वाढू लागली आहे. तालुक्यात गेल्या १० दिवसात ३७२ कोरोना रुग्ण आढळले असून ३७१ जण अद्यापही उपचार घेत आहेत, तर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या साडेचार हजारपेक्षा जास्त झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.
शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर लोकांनी नियम पाळणे बंद केले होते. त्यामुळेच रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या १० दिवसात तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १५७ झाली आहे. लोणंद केंद्राअंतर्गत १३८, तर अहिरे केंद्रांतर्गत ७७, अशी एकूण ३७२ झाली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हात-पाय पसरले आहेत. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ४ हजार ६११ पर्यंत पोहोचली आहे. शिरवळ, खंडाळा, लोणंदसह अंदोरी, खेड बुद्रुक या गावांत रुग्णसंख्या अधिक आढळल्याने धास्ती वाढली आहे. त्यातच कोरोनाची चाचणी करण्यासाठी विलंब होत असल्याने अहवाल उशिरा येत आहेत. त्यामुळे अनेक जण तपासणीच्याच प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोनाला अटकाव करण्यासाठी नगरपंचायत क्षेत्रात प्रशासनाने नियम काटेकोरपणे राबविणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनानेही कडक बंदोबस्त ठेवून लोकांवर वचक ठेवण्याची गरज आहे.
कोट :
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे.
- दशरथ काळे, तहसीलदार
फोटो ओळ :
खंडाळा ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. (छाया : दशरथ ननावरे)