सातारा : जगभरातील धावपटूंसाठी आकर्षण ठरलेल्या ‘गोवा रिव्हर मॅरेथॉन’मध्ये सातारा जिल्ह्यातील तब्बल २७२ स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी २ तास ४० मिनिटात २१ किलोमीटर अंतर पार केले. गेल्यावर्षीही गोव्याच्या या मॅरेथॉनमध्ये सातारकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. मात्र, गेल्यावर्षी ही संख्या अवघी ४१ इतकी होती. यंदा मात्र, सात पटीने ही संख्या वाढली आहे.वॉस्को विमानतळापासून सुरु झालेली ही स्पर्धा संपूर्ण गावातून फिरुन पुन्हा त्याच ठिकाणी समाप्त झाली. या स्पर्धेत १०, २१ अन् ४२ किलोमीटर असे तीन टप्पे आखण्यात आले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अन् डॉ. दीपक थोरात यांनी २१ किलोमीटर अंतर २ तास ४० मिनिटात पार केले. या स्पर्धेत संपूर्ण जगभरातून ४ हजारांपेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. साताऱ्यातील डॉ. अनिल पाटील यांचे वडील यशवंत पाटील हे तर वयाच्या ८१ व्या वर्षीही उत्साहाने धावले.अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. संदीप काटे अन् डॉ. देव यांनी सपत्नीक भाग घेतला. तसेच राजू भोसले, डॉ. कैलास खडतरे यांच्यासह इतरही स्पर्धक या स्पर्धेत उत्साहाने धावले (प्रतिनिधी)
गोव्याच्या ‘रिव्हर मॅरेथॉन’मध्ये तब्बल २७२ सातारकर धावले !
By admin | Published: December 14, 2015 10:20 PM