सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलाची राज्यभर ख्याती आहे. अनेक मोठ-मोठ्या कारवाया जिल्हा पोलीस दलाने केल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठीही पोलीस सदैव सतर्क असतात. अशा पोलीस दलाचा जिल्ह्यातील २९ पोलीस ठाण्यातून कारभार चालतो.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परंपराही आहे. सर्व क्षेत्रात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्यादृष्टीनेही पोलीस काम करत असतात. एखादा गुन्हा घडूच नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. एखादा गुन्हा घडला तरी पोलीस त्याची उकल करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे काम चांगले ठरले आहे. तसेच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व त्यांचे पोलीस दल नेहमीच कायदा व सुव्यवस्था कायम कशी राहील, हेच पाहत आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे. सातारा शहरात तर तीन दिवसांपासून कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांनी वचक बसवलाय. तसेच लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
चौकीतूनही काम
जिल्ह्यात पोलीस ठाणी आहेत. तसेच या ठाण्याच्या अंतर्गत महत्त्वाच्या गावांत, मुख्य शहरातील काही भागांत पोलीस चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या चौकीतूनही लोकांच्या तक्रारींची दखल घेतली जात असते.
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची संख्या २९ असली तरी आणखी काही नवीन प्रस्तावित आहेत. साताऱ्यात सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाणे आहे. तसेच एमआयडीसी ठाण्याचीही मागणी आहे.