सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली.
दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते. पण यावर्षी एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर झाले. सुरुवातीला खटाव तालुक्यात टँकर सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाटण, वाई आणि माण तालुक्यांत टँकर सुरू झाले. सध्या सर्वच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माणमध्ये इतर तालुक्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे. सध्या ४ गावे आणि १७ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. या टँकरवर ४ हजार ३०७ लोक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील ३ गावे आणि ४ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सध्या या तालुक्यातील १ हजार ६७३ नागरिक आणि १ हजार ३५ पशुधन टँकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यातील ४ गावांनाही टंचाईची झळ बसत आहे. तसेच पशुधनासाठीही पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी २ टँकर सुरू आहेत. वाई तालुक्यातही ३ गावे व ३ वाड्यांसाठी २ टँकर सुरू आहेत. तसेच पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतही टंचाई आहे.