सातारा : मुद्दलसह व्याजाचे ३ कोटी ४ लाख ७७ हजार ५०० रुपये देऊनही खासगी सावकारांकडून पैशाची आणखी मागणी होत असल्याने एका व्यावसायिकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर खासगी सावकारीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विजय वसंतराव चाैधरी, अजिंक्य चाैधरी, कल्पना विजय चाैधरी (सर्व रा. देशमुख काॅलनी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनोज गणपती महापरळे (वय ४४, रा. तारळे, ता. पाटण, सध्या रा. जयभवानीनगर, संभाजीनगर, कोडोली, ता. सातारा) हे व्यावसायिक असून, महापरळे यांना वळोवेळी संशयित आरोपींनी १ कोटी ९२ लाख रुपये व प्लॉटचे ५० लाख रुपये असे एकूण २ कोटी ४२ लाख रुपये व्याजाने दिले होते. मात्र, त्यापोटी महापरळे यांनी ३ कोटी ४ लाख ७७ हजार ५०० रुपये व्याज व मुद्दलसह पैसे त्यांना परत दिले.
परंतु, ठरल्याप्रमाणे महापरळे यांच्या नावे प्लॉट न करता त्यांची फसवणूक केली. तसेच तारण म्हणून घेतलेले ६५ तोळे सोन्याचे दागिने महापरळे यांना परत न करता उलट व्याजाची, मुद्दलाची मागणी करत राहिले. व्याजाची मागणी करण्यासाठी विजय चौधरी, अजिंक्य चौधरी हे मनोज महापरळे यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी शिवीगाळ, दमदाटीही केली. गोडावूनच्या चाव्या मागून 'तुझा कार्यक्रम ५ लाखांमध्ये करेन. तुला व तुझ्या कुटुंबास जीवंत सोडणार नाही,' अशी धमकीही दिली. विजय चौधरी, कल्पना चौधरी यांनी मोबाइलवरून शिवीगाळ करत दमदाटी केली. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी हे करीत आहेत.