सातारा: वधू-वराकडील मंडळी लग्नसोहळ्यात दंग असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ३ लाख १४ हजारांचे दागिने हातोहात लांबविल्याची खळबळजनक घटना वर्ये, ता. सातारा येथे दि. २३ रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वर्ये, ता. सातारा येथील एका मंगल कार्यालयात दि. २३ रोजी लग्नसोहळा होता. या लग्नसोहळ्याला वधू-वराकडील वऱ्हाडींनी हजेरी लावली होती. लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडल्यानंतर वधूच्या खोलीतील दागिने गायब झाल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मंगल कार्यालयात एकच गोंधळ उडाला. चोरट्यांनी दागिने असलेली पिशवीच हातोहात लांबविली. पिशवीमध्ये साडेसात ग्रॅम वजनाचे कानातील टाॅप्स, दीड तोळ्याचे मणिमंगळसूत्र, अडीच तोळ्यांचे चार सोन्याचे क्वाइन, चांदीची मूर्ती, चांदीचे पैंजण एकूण पाच जोड, ५० हजारांची रोकड तसेच ५० हजार रुपयांची आहेराची पाकिटे असा सुमारे ३ लाख १४ हजारांचा ऐवज होता. या घटनेनंतर नातेवाइकांनी मंगल कार्यालयात चोरट्याचा शोध घेतला. मात्र, चोरटा सापडला नाही. याबाबत मीना शिंदे (रा. कोडोली, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.
मंडळी लग्नसोहळ्यात दंग, चोरट्यांने मारला दागिन्यांवर डल्ला; साताऱ्यातील घटना
By दत्ता यादव | Published: June 24, 2023 4:09 PM