वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याचे लक्ष वेधलेल्या भाडळे ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक दि. १९ डिसेंबर रोजी होत आहे. या ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तीन जागांवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचारांच्या गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पाच जागांसाठी दहा जण निवडणुक रिंगणात आहेत या ग्रामपंचायतीची निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. यावेळी सरपंचपदाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी चार असे पक्षीय बलाबल झाले होते. सत्ता स्थापनेपूर्वीच काँग्रेसचा एक सदस्य राष्ट्रवादीत सामिल झाल्याने उपसरपंचपद राष्ट्रवादीला मिळाले होते. त्यानंतर काही दिवसांतच असलेल्या दोन गटांपैकी राष्ट्रवादीच्या एका गटाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडून आलेल्या सदस्यांनी निवडणूक खर्च वेळेत न दिल्याबाबतची याचिका दाखल केली होती. यावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीचे आठ सदस्यांना अपात्र ठरवत या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूककेली होती. आता या अपात्र ठरलेल्या आठ जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती.वार्ड क्रमांक तीन मधील हनुमान वार्डमधील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित पाच जागांसाठी दि. १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पाच जागांसाठी दहाजण निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी किमान दोन जागांची आवश्यक्यता लागणार आहे. तर राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षिय एकत्रित आले असल्याने राष्ट्रवादीपुढे सर्व पक्षियांचे आव्हान राहणार आहे.आमदार शशिकांत शिंदे प्रणित राष्ट्रवादी गटाचे नेतृत्त्व अनिरुध्द तावरे, कृष्णराव घोरपडे, संजय घार्गे, विश्वास मोहिते, चरण मोहिते व विश्वास खरात करत आहेत. विजय घोरपडे, युवराज घोरपडे, रमेश घोरपडे करीत आहेत.या ग्रामपंचायतीच्या सत्ता स्थापनेसाठी दोन्ही गट आक्रमक झाले आहेत. भाडळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यात यश येणार का? याबाबत तालुक्यात उस्तुकता आहे. (वार्ताहर)
८ जागांपैकी ३ बिनविरोध; ५ जागांसाठी दुरंगी लढत
By admin | Published: December 09, 2015 1:19 AM