वाई : गेल्या अडीच महिन्यांपासून वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ७९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, केवळ २४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
वाई तालुक्यात प्रारंभीचे काही महिने कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासन, पंचायत समिती व आरोग्य यंत्रणेकडून ठोस पावले उचलण्यात आली. नागरिकांची गृहभेटीद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. शासन नियमांची काटेकोर अंमलबजाणी करण्यात आल्याने तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता पूर्णत: नियंत्रणात आली आहे.
वाई शहरासह तालुक्यातील १०३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला तर अकरा गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखले. तालुक्यात जानेवारी महिन्यात एकूण ५४ नवे रुग्ण सापडले असून, बाधितांचा आकडा आता ३ हजार ९५७ वर पोहोचला आहे. यापैकी ३ हजार ७९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, केवळ २४ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाने कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. तरीही सर्वांनी गाफील न राहता शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
(कोट)
कोरोना लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून प्रथम आरोग्य कर्मचारी यानंतर पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण केले जाणार आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आले असले तरी प्रत्येकाने खबरदारी घेऊन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
- रणजीत भोसले, तहसीलदार
(पॉइंटर)
तालुक्यातील कोरोना स्थिती
एकूण बाधित ३९५७
कोरोनामुक्त ३७९३
उपचार सुरू २४
मृत्यू १४०
फोटो : कोरोनो इमेज