सातारा : व्यवसाय परवाना देण्यासाठी चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवकुमार बाबूराव कोडगिरे (वय ४९) यांच्या पुण्यातील घरामध्ये ८० हजारांची रोकड सापडली आहे. तसेच त्यांच्या नावावर पुण्यात एक फ्लॅट असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, कोडगिरेंना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन कोठडी सुनावत सोमवार, दि. २९ रोजी जामीन दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे कोडगिरेंना तीन दिवस कारागृहाची हवा खावी लागणार आहे. सहायक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांना लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात आणि साताºयामध्ये एकाचवेळी कोडगिरेंच्या घरामध्ये छापा टाकला.
पुण्यातील वारजे परिसरात मेघवर्षा सोसायटीमध्ये कोडगिरे यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना ८० हजारांची रोकड सापडली. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागली आहेत. त्यांच्या नावावर एक फ्लॅट सुद्धा आहे, असे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले.
शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस पोलीस कोठडी मागितली. मात्र, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत दि. २९ ला जामीन दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे कोडगिरेंना तीन दिवस कारागृहात राहावे लागणार आहे.