स्वप्नील शिंदे सातारा : दुष्काळ, अवकाळी या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या महाभयंकर परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. जीवाचे रान करून अगदी वेळेत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४० कंटेनरमघून २५० टन द्राक्ष युरोपच्या बाजारात रवाना झाले आहेत.जानेवारीच्या सुरुवातीला द्र्राक्षाचा अवघा एक कंटेनर युरोपकडे रवाना झाला होता. मात्र, महिन्याच्या अखेरपर्यंत कंटेनरची संख्या वाढत ४० पर्यंत पोहोचली. जिल्ह्णातील द्र्राक्ष हंगामाची सुरुवात अनेक अडथळ्यांतूनच झाली आहे. उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली.
पाणी टंचाईच्या समस्येवर विविध उपाययोजना करून बागा जगविल्या. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात बागांची छाटणी केल्यानंतर अवकाळी पाऊस पडला. त्यात ५५ टक्के बागांचे पावसाने नुकसान झाले. त्यानंतर हिवाळा असला तरी ढगाळ वातावरण आहे. या स्थितीत हवामानातील चढ-उतार सुरूच आहेत.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पहिल्यापासून संकटावर मात करण्याचा निर्धार ४१७ शेतकऱ्यांनी युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात करण्यासाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली.खटाव परिसरात जम्बो सीडलेस, सोनाका, आरके सीडलेस, थॉमसन सीडलेस, तास गणेश व क्लोन आदी वाणांच्या द्राक्षाची निर्यात केली जाते. गेल्यावर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा व्यापाऱ्यांची पावले द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.
शेतकऱ्यांनीही जीवाचे रान करून ४० कंटेनरमधून २५० टन द्राक्ष नेदरलँड, जर्मनी व दुबईत निर्यात केली. पुढील आठवड्यामध्ये साधारण ४० टन द्राक्ष निर्यात होणार आहेत.युरोपातील खरेदीदारांकडून भारतातील जम्बो सीडलेस, सोनाका, आरके काळ्या वाणांसोबत जास्त मागणी असते. यावर्षीही साधारण १०० ते १२० रुपये दर मिळत आहे. येत्या काळात मागणी वाढून शिवार सौद्यांचे प्रमाण वाढत जाणार आहे.
सध्या पहिल्या टप्प्यात मायणी मंडलातून नेदरलँड, जर्मनी, दुबई आदी देशांमध्ये द्राक्ष निर्यात करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत आणखी निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे.- दिलीप दाभाडे, कृषी अधिकारी