कऱ्हाड : गतवर्षी झालेल्या ७५ लाखांच्या चोरीप्रकरणात सख्ख्या भावांना कऱ्हाड पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली जीपही हस्तगत करण्यात आली असून, आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.
यशवंत अण्णा पिटेकर, बबन अण्णा पिटेकर (दोघेही रा. म्हाळंगी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव-मुंबई येथील व्यापारी विक्रम मिश्रीलाल जैन हे सोने-चांदी विक्रीचा घाऊक व्यापार करतात. इतर व्यावसायिका-ंकडून सोने घेऊन ते त्याची इतर शहरांमध्ये विक्री करण्यासाठी जातात. ११ मे २०१६ रोजी रात्री जैन हे खासगी बसने शिमोगाहून गोरेगावला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्याकडील बॅगमध्ये सोन्याचे गंठण, ब्रेसलेट, नेकलेस, कानातील टॉप्स असे ७५ लाखांचे अडीच किलो दागिने व अडीच लाखांची रोकड होती. शिमोगाहून निघाल्यानंतर काही वेळाने जैन यांना झोप लागली. सातारा जिल्ह्यातील खंडाळ्या-नजीक किकवी गावात बस पोहोचली असताना जैन यांना जाग आली असता आपली बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी संबंधित बस किकवी पोलीस दूरक्षेत्रात नेऊन चोरीची फिर्याद दिली. मात्र, हा गुन्हा कºहाड हद्दीत झालेने किकवी पोलिसांनी तो कऱ्हाड शहर पोलिसांकडे वर्ग केला होता.कऱ्हाड पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत काकंडकी यांच्या पथकाने चोरीतील संशयित सराफ रावसाहेब जाधवसह त्याच्या मेहुण्याला करमाळ्यातून ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्याकडे तपास सुरू असताना रावसाहेबचा मृत्यू झाला. याप्रकरणी विकास धस, हनुमंत काकंडकी यांच्यासह बारा पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास थंडावला होता.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना या चोरी प्रकरणातील मुख्य संशयित करमाळ्यात येणार असल्याची माहिती मिळाली. जाधव यांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचत करमाळा, कर्जत पोलिसांच्या मदतीने व्यूहरचना आखली. जीपमधून गुरुवारी पहाटे सहाजण चोरीच्या उद्देशाने करमाळा परिसरात फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर यातील बबन पिटेकर, यशवंत पिटेकर यांचा कऱ्हाडच्या चोरी प्रकरणात हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.पाळत ठेवून करायचे चोरीया प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता असून, ही टोळी पाळत ठेवून खासगी बसमध्ये चोरी करायची, अशी माहिती पोलिस तपासातून समोर येत आहे. महागड्या वस्तू किंवा बॅग घेऊन बसमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या पाठीमागील सीटवर बसायचे आणि संधी मिळाली की, त्याची बॅग अथवा वस्तू घेऊन बसमधून खाली उतरायचे, अशी या टोळीची चोरीची पद्धत होती. तसेच चोरीवेळी या टोळीची जीप संबंधित बसचा पाठलाग करीत होती, असेही पोलिसांनी सांगितले.