फलटण : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील एका महानुभावपंथीय मठामधील सुमारे तीस जण कोरोनाबाधित आढलेले आहेत. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्याबरोबरच फलटण तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच फलटण तालुक्यातील एका मठातील तीस जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. तरडगावमध्ये आवश्यक त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करून कोरोनाचा फैलाव होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेवेळी ग्रामस्थ व प्रशासनाने एकमेकांना सहकार्य केले. मात्र, दुसऱ्या लाटेत तसे होताना दिसत नाही. फलटण तालुक्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
रुग्ण वाढत असल्याने तरडगाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.