रामापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून पाटण तालुक्यातही लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ३० हजारांवर नागरिकांना लस देण्यात आली आहे, तर पाटण ग्रामीण आरोग्य केंद्रात नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
पाटण तालुक्यातील आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील १५ केंद्रांमध्ये कोरोनाची लस देण्यात येत आहे. यामध्ये पाटण ग्रामीण रुग्णालयाने लसीकरणात ५ हजारांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरण प्रकिया नियोजनबद्ध होत असल्याची प्रतिक्रिया लस घेतलेल्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पाटण तालुका आरोग्य विभागाच्या अंतर्गत संपूर्ण तालुक्यात १५ आरोग्य केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांतून कोरोनाची लस देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातच आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त असतानाही योग्य नियोजन करून लसीकरण सुरू आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य कर्मचारी कोरोना लसीबाबत जनजागृती करत आहेत. तसेच कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. याला तालुक्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाटण तालुक्यात आतापर्यंत ३० हजार ४८ नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. पाटण ग्रामीण रुग्णालयात ५ हजार २०३ जणांना लसीकरण केले आहे, तर हेळवाक केंद्रात १ हजार ६०३, काळगाव १ हजार ९९५, केरळ १ हजार ८२८, मल्हारपेठ ३ हजार ११५, मरळी १ हजार ९५७, मोरगिरी १ हजार ६२३, मुरुड १ हजार ६२३, सळवे ९८६, सणबूर ७६९, सोनावडे १ हजार ४१८, तळमावले १ हजार ६४९, तारळे २ हजार १६७, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालय २ हजार ६६१ अशाप्रकारे ३० हजार ४८ नागरिकांना लसीकरण झाले आहे. यामध्ये पुरुषांची संख्या २५ हजार ४५७, तर महिलांची संख्या ४ हजार ५७३ इतकी आहे.