सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झाला असून, गत चोवीस तासांत तब्बल ३०८ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरले आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र कोरोनाची संख्या चार पटीने वाढत आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात गतवर्षी २२ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याला आता पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात एकदाही कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली नाही. उलट वाढतच गेली. आता तर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्हा प्रशासन अक्षरश: हादरून गेले आहे. प्रशासनाने एकीकडे लसीकरणाचा वेग वाढविला असताना, दुसरीकडे मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चालूवर्षीची ही ३०८ ची रुग्णसंख्या उच्चांकी आहे. ही आकडेवारी पाहून कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत. केवळ एका आठवड्यात एक हजारांहून अधिक रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ६१ हजार ३३५ वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ८७५ झाला आहे.