परळी : सातारा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊन झाल्यावर मुंबईकर जसजसे परतले, तसतसे ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.
सोनवडीत गेल्या महिन्यापूर्वी मुंबईहून गावाकडे आलेला एक युवक कोरोनाबाधित झाल्यावर त्याचे आई-वडील त्याचे आजोबा आणि त्यांच्या हायरिस्कमध्ये आलेले शेजारी कोरोनाबाधित झालेले आहेत. रविवारी ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मानसी पाटील, डॉ. वैशाली माने यांनी दिवसभर तपासणी करून हायरिस्क लोकांचे, तसेच ज्यांना लक्षणे दिसून येत होती अशा लोकांच्या तपासण्या केल्या असून, संपूर्ण गावाची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई किंवा बाहेरून आलेल्या लोकांनी होम क्वॉरंटाईन व्हावे, कोणतेही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणताही आजार असल्यास तो लपवू नये, सोनवडी येथील लसीकरणासाठी ग्रामस्थांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
कोट..
आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना होम क्वॉरंटाईन सुरुवातीस योग्य प्रकारे झाले नाही. येथून पुढे आम्ही दक्ष झालो आहोत. कोणत्याही प्रकारची कसूर आम्ही ठेवणार नाही. जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहोत.
- महेश कदम, उपसरपंच, सोनवडी